Breaking News

‘बॉईज’ मध्ये दिसणार सनी लिओनीचा मराठमोळा अंदाज सचिन पिळगावकर, सुरेश वाडकर यांच्या हस्ते झाले सिनेमाचे सॉंग आणि ट्रेलर लॉंच

Mumbai Kabir Ali
‘बॉईज’ मध्ये दिसणार सनी लिओनीचा मराठमोळा अंदाज
सचिन पिळगावकर, सुरेश वाडकर यांच्या हस्ते झाले सिनेमाचे सॉंग आणि ट्रेलर लॉंच

किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणारा ‘बॉईज’ हा सिनेमा, प्रदर्शनापूर्वीच अधिक गाजत आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित येत्या ८ सप्टेंबरला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात चक्क सनी लिओनी थिरकताना दिसणार आहे. नुकत्याच झालेल्या या सिनेमाच्या सॉंग लॉंच सोहळयाला तिने विशेष उपस्थिती लावली. शिवाय, सुरेश वाडकर आणि सचिन पिळगावकर या दिग्गज व्यक्तीमत्वांच्या हस्ते ‘बॉईज’ सिनेमाच्या म्युझिक आणि ट्रेलरचे दिमाखात अनावरण करण्यात आले.
वरळी येथील प्रशस्त ‘ब्ल्यू सी’ मध्ये पार पडलेल्या या सिनेमाच्या संगीत अनावरण सोहळ्यात सनी लिओनी आकर्षणाचा विषय ठरली. विशाल देवरूखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ या सिनेमातील सनीवर आधारित ‘कुठे कुठे जायचे हनिमूनला’ या मराठमोळ्या लावणीचे सादरीकरण तिच्या हस्ते करण्यात आले. ‘मराठी संस्कृतीचा पेहराव या गाण्याच्या निमित्ताने मला परिधान करायला मिळाला, मी पहिल्यांदाच नऊवारी साडी घातली होती. हे गाणे माझ्यासाठी खूप खास असून, ह्या गाण्याला सुपरहिट मिळेल अशी मी आशा करते’ अशी भावना सनीने यावेळी व्यक्त केली.
याच कार्यक्रमात सचिन पिळगावकर आणि सुरेश वाडकर यांच्या हस्ते ‘बॉईज’सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच करण्यात आले. तीन मित्रांची दुनिया या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड हे कलाकार दिसून येत असून, पार्थ आणि प्रतिकच्या खोड्या आणि सुमंतचा शांत, सुशील स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो. खेळात तसेच अभ्यासात अव्वल असणारा सुमंत, ह्या दोन खट्याळ मित्रांच्या सानिध्यात येऊन कसा बदलतो, हे या ट्रेलरमध्ये दिसून येते. तसेच घरापासून दूर बॉर्डींगमध्ये राहत असलेल्या मुलांची रंगीत दुनियादेखील ट्रेलरमध्ये पाहायला मिळत असून, अभिनेता संतोष जुवेकर एका शिक्षकाच्या भूमिकेत आपल्याला यात दिसून येतो. ह्या सिनेमाचा ट्रेलर ‘बॉईज’ या नावाला साजेसा असून, किशोरवयीन मुलांची दुनिया यात मांडण्यात आली आहे. मैत्री, प्रेम, शाळा आणि अभ्यास या चार भिंतीतील त्यांची रंगीत दुनिया ‘बॉईज’च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
ह्या सिनेमातील गाण्यातही ‘बॉईज’गिरी ठासून भरलेली आपल्याला दिसून येईल. एकेकळी हिंदी अभिनेत्री रेखावर चित्रित केलेल्या लावणीचा सिक्वेल यात असून, सनीचा मराठमोळा लूक आपल्याला पाहायला मिळतो. अवधूत गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित या गाण्याला सुनिधी चौहानचा आवाज लाभला असल्यामुळे, सनीवर आधारित असलेली हि ठसकेदार लावणी चांगलीच गाजेल यात शंका नाही. शिवाय, ‘बॉईज’ सिनेमातील सध्या गाजत असलेले वैभव जोशी लिखित ‘जीवना’ तसेच अवधूत गुप्ते लिखित ‘लग्नाळू’ आणि ‘यारीया’ या गाण्याचे देखील सादरीकरण यावेळी करण्यात आले. स्वप्नील बंदोडकरच्या आवाजातील ‘जीवना’ या गाण्याला रसिकांचा उंदड प्रतिसाद मिळत असून, वयात येणाऱ्या मुलांच्या प्रेमभावना दाखवणा-या ‘लग्नाळू’ ह्या गाण्यालादेखील प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळत आहे. कौस्तुभ गायकवाड आणि जनार्दन खंडाळकर या जोडीने हे गाणे गायले असून नुकतेच प्रदर्शित झालेले विजय प्रकाश यांच्या आवाजातील ‘यारीया’ हे गाणेदेखील लोकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरत आहे.
विशेष म्हणजे, या सिनेमातील गाण्याच्या संगीत दिग्दर्शनाबरोबरच, अवधूत गुप्ते प्रथमच प्रस्तुतकर्त्याचीदेखील धुरा सांभाळणार आहे. कम्प्लीट यूथ एंटरटेनिंग असणाऱ्या या सिनेमात झाकीर हुसेन, शिल्पा तुळसकर, शर्वरी जमिनेस, रितिका शोत्री आणि वैभव मांगले हे कलाकारदेखील आपापल्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या गणेशोत्सवात प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा रसिकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरणार आहे.